पुणे : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजीमहाराजांचा अवमान झाल्यानंतर मनाला वेदना होतात. हे विकृतीनंतर वेळीच थांबवणे आवश्यक आहे. यापुढे महापुरुषांचा अवमान केल्यास देशद्रोहाच्या कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधत अशा लोकांवर कारवाई होत नसेल तर शिवरायांचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही असे त्यांनी ठणकावले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यपालांचा राजीनामा घेण्याची मागणीही होत आहे. दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवप्रेमी संघटनांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारबद्दल संताप व्यक्त केला.
राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांना अभिवादन केले जाते. त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला जातो. मात्र अलीकडील काळात राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन महाराजांबद्दल विधाने केली जातात. नवीन पिढीसमोर चुकीचा इतिहास मांडला जात आहे. तुम्हाला जर महाराजांचा अपमान करायचा असेल तर त्यांचे नाव कशाला घेता असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
महाराजांचा अवमान होणं ही मनाला प्रचंड वेदना देणारी बाब आहे. त्यामुळे आता हे विकृतीकरण थांबलेच पाहिजे. अवमान करणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार नसाल तर तुम्हाला महाराजांचे नाव घेण्याचा कसलाही अधिकार नाही अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.