मुंबई : प्रतिनिधी
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखीव ठेवला आहे. तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
दरम्यान, ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला विरोध दर्शवला आहे. संजय राऊत हे प्रभावी नेते आहेत. त्यांना जामीन मिळाल्यास या प्रकरणातील पुढील चौकशीचे पुरावे ते नष्ट करतील. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रशांत राऊत यांच्या माध्यमातून मोठी भूमिका बजावलेली आहे असे ईडीने म्हटले आहे.
सध्या खटल्याची परिस्थिती महत्त्वपूर्ण वळणावर आहे. या प्रकरणात दररोज नवीन तथ्ये आणि पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणात संजय राऊत यांनी निभावलेली भूमिका समोर येत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये संजय राऊत यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे मत ईडीने नोंदवले आहे.