मुंबई : प्रतिनिधी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा रमेश लटके आणि भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गट ही जागा लढवेल अशी शक्यता असतानाच भाजपकडून मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीतून शिंदे गटाने माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. हा संपूर्ण वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असून निवडणूक आयोगापुढे चिन्ह आणि पक्षाच्या नावाबद्दल सुनावणीनंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यानंतर दोन्ही गटाला नवीन नावासह चिन्ह देण्यात आले आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत स्व. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र मुंबई महानगरपालिकेत नोकरीला असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता होती. त्यामुळे लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या राजीनाम्याचा मार्ग मोकळा करून घेतला. त्यानंतर त्यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गटाकडून लढवली जाईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र शिवसेनेतील बंडानंतर होत असलेल्या पहिल्याच निवडणुकीतून शिंदे गटाने सपशेल माघार घेतली आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली असून आज त्यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. एकूणच सत्तासंघर्षानंतर होत असलेली ही पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार असून यात कोण जिंकेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.