बीड : प्रतिनिधी
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीही याबद्दल संशय व्यक्त करत या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वास्तविक एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेच चेहरा पांढरा पडत नाही, मात्र विनायक मेटे यांच्याबद्दल असं घडल्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रविवारी पहाटे मुंबईकडे जाताना विनायक मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला. त्यामध्ये मेटे यांचे उपचारांपूर्वीच निधन झाले. अपघातानंतर एक तासापर्यंत कसलीही मदत उपलब्ध झाली नसल्याचा दावा त्यांचे चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. त्यानंतर विविध नेत्यांकडून या अपघाताबद्दल संशय व्यक्त करण्यात आला. आता खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीच याबद्दल शंका उपस्थित केली आहे.
वैद्यकीय शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चेहरा लगेच पांढरा पडत नाही. मात्र मेटे यांच्या चेहरा पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू होता. मी त्यांची हाताची आणि मानेची नाडीही तपासली. मात्र ती हाताला लागली नाही असेही डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले. विनायक मेटे यांच्या ईसीजीमध्येही काही हालचाली आढळून आल्या नसल्याचे डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले.
आमच्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. नेमकं काय घडलं याबद्दल काहीही माहिती नाही. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं डॉ. ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे.