नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक गुळूंचे गावच्या हद्दीतील रूपाडीच्या माळाच्या चढावर गुटखा घेऊन चाललेल्या आयशर टेंम्पोला नीरा पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत आयशर टेंम्पो व गुटख्यासह सुमारे ४३ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला. रविवारी (दि.१४) पहाटे चार वाजता ही कारवाई करण्यात आली.
नीरा पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, रविवारी ( दि.१४) पहाटे चारच्या सुमारास संशयित आयशर कंपनीचा टेंपो क्र एम.एच.१३ सी.यु ४३४५ हा मोरगांव रोडने गुटखा घेऊन चालला आहे, अशी बातमी सहाय्यक फौजदार सुदर्शन होळकर यांना नीरा गावांत पेट्रोलिंग करताना गोपनिय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर त्यांनी सदरची माहिती फौजदार नंदकुमार सोनवलकर यांना दिली. सहा.फौजदार होळकर यांनी पोलिस स्टाफसह सरकारी वाहनाने मोरगांव रोडणे जात सदर टेंपोचा पाठलाग सुरू केला.
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावच्या हद्दीत रूपाडीच्या चढावर त्या टेंपोस थांबवून ड्रायव्हरकडे चौकशी केली. चौकशीत दावलमलीक हुसेनसाब चौधरी (वय २१) रा.जकळवेट्टी ता.अथणी, जि.बेळगांव (कर्नाटक), आरीफ हुसेन रोहीले (वय ३७) रा.मिरज, जि.सांगली यांनी गाडीतील मालाबद्दल उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर टेंपोला पोलिसांनी नीरा पोलिस दुरक्षेञात आणल्यानंतर गाडीची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये सुमारे २१ लाख ४५ हजार किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला हीरा पान मसाला नावाचा गुटखा, सुमारे ११ लाख ५५ हजार किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली रॉयल ७१७ नावाची सुगंधी तंबाखू , सुमारे १० लाख कंमतीचा आयशर टेंपो असा एकूण ४३ लाख रूपये किंमतीचा माल मिळून आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, पुरंदर- भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नंदकुमार सोनवलकर , सहा.फौजदार सुदर्शन होळकर, पोलिस हवालदार संदीप मोकाशी, राजेंद्र भापकर, पोलिस नाईक नावडकर, हरिश्चंद्र करे, पोलिस कॉन्स्टेबल निलेश जाधव, होमगार्ड सागर साळुंखे, बापु बरकडे, नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, पोलिस मिञ रामचंद्र कर्नवर यांनी केली. सदरचा गुन्हा जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला असून पुढील तपास फौजदार नंदकुमार सोनवलकर करीत आहे.