मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेणार असल्याची चर्चा आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाष्य करत मिश्किल टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेणार असल्याची बाब कानावर आली. नागपूर ही उपराजधानी सोडून ते पुण्यात येत आहेत. पुण्याचा सुपुत्र म्हणून त्यांचं स्वागतच आहे असा टोला अजितदादांनी लगावला आहे.
१७ ऑगस्टपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. राज्यात अनेक प्रश्न असताना अद्याप खातेवाटप झालेलं नाही. सर्वजण बिनखात्याचे मंत्री आहेत. कदाचित दिल्लीतून सिग्नल आला नसेल असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्री कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेत नाहीत. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीपद घेण्याची प्रथा आपणच सुरू केली आहे. त्यामुळे आताचेही उपमुख्यमंत्री पालकमंत्रीपद घेतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्रीपद घेत असल्याचे कानावर आले आहे. मात्र नागपूरसारखी उपराजधानी सोडून ते पुण्यात येत आहेत. पुण्याचा सुपुत्र म्हणून त्यांचे स्वागतच आहे, असा टोलाही लगावला.