मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेला मंत्रीमंडळाचा विस्तार आज अखेर झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नव्या मंत्रीमंडळाने जनतेची कामे करण्यावर भर द्यावा असे सांगत या मंत्रीमंडळात काही नावं टाळायला हवी होती, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याकडेच लक्ष लागलेलं होतं. राज्यातील अनेक प्रश्न मंत्रीमंडळ विस्ताराअभावी प्रलंबित होते. आज अखेर या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला असून या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, आता राज्यातील जनतेची, विकासाची कामं करावीत” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. या मंत्रीमंडळाच्या आजच्या विस्तारात काही आमदारांची नावे टाळता आली असती तर योग्य ठरलं असतं असं सांगत त्यांनी नवीन मंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.
अजित पवार यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया दिल्यामुळे आता ‘ते’ मंत्री कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विरोधकांची आक्रमक भूमिका पहायला मिळेल यांचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत.