मुंबई : प्रतिनिधी
शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला असून तातडीने पावसाळी अधिवेशनही होणार आहे. १० ते १८ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना मंत्रीमंडळ विस्तारासह अधिवेशन घेण्याची मागणी विरोधकांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
राज्यात अतिवृष्टीसह दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी अक्षरश: हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांसह राज्यातील अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने मंत्रीमंडळ विस्तार करून पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली होती.
तब्बल ३८ दिवसांच्या घडामोडीनंतर सरकारला मुहूर्त मिळाला असून उद्या सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ विस्तार होणार असून १० ते १८ ऑगस्ट या कालावधीत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. राज्यात अतिवृष्टी झालेली असताना सरकारकडून कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. तसेच मंत्रीमंडळ अस्तित्वात आले नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे आता बुधवारपासून होणाऱ्या अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे.