नीरा : प्रतिनिधी
कैवल्यसम्राज्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीहून परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्याच्या सीमेवर पुरंदर तालुक्यातील नीरा येथे सोमवारी (दि.१८) सकाळी ९.३० वाजता प्रवेश केला. तत्पुर्वी परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना प्रथेप्रमाणे नीरा नदीच्या काठावरील प्रसिद्ध दत्तघाटावर माऊली.. माऊलीच्या नामघोषात नीरा स्नान घालण्यात आले.
माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील पाडेगांव येथील शेवटचा मुक्काम आटोपून आज सोमवारी सकाळी नऊ वाजता नीरा नदीकिनारी दाखल झाला. यावेळी माऊलींच्या पादुकांना रथातून उतरवून सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात देण्यात आल्या. आळंदी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सोहळाप्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, दिनकर पाटील, सतिश शिंदे, चोपदार बाळासाहेब रणदिवे यांच्यासह मानकऱ्यांनी खळखळून वाहणाऱ्या नीरा नदीच्या पवित्र तीर्थांनी नीरा स्नान घातले. यावेळी वारकऱ्यांनी माऊली..माऊलीचा जयघोष केला. नीरास्नानानंतर आरती करण्यात आली.
सकाळी साडेनऊ वाजता पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून नीरा नदीवरील जुन्या ब्रिटीशकालीन पुलावरून पुणे जिल्ह्यातील नीरा (ता.पुरंदर) येथे प्रवेश केला. सोहळ्याचे नीरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरंपच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, ग्रा.पं.सदस्य अनंता शिंदे, विजय शिंदे यांच्यासह नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीभावात पालखीचे स्वागत केले. रथ अहिल्यादेवी चौकात आल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी रथातून उतरवून खांद्यावर घेतली. दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विठ्ठल मंदिरात ठेवण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
नीरेतील दुपारचा विसावा संपवून पालखी सोहळा दुपारी दोन वाजता वाल्हेनगरीकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. यावेळी माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव चव्हाण, समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीच्या परतीच्या सोहळ्यास मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
यावेळी नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार नंदकुमार सोनवलकर, सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे, पो.हवालदार संदीप मोकाशी, पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.
सोमेश्वर कारखान्याच्या वतीने अन्नदान
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही सोहळ्यातील वारकऱ्यांना विठ्ठल मंदिरात विसाव्याच्या ठिकाणी अन्नदान करण्यात आले. यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, संचालक लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, कर्मचारी आदी उपस्थित होते.