बारामती : प्रतिनिधी
महादेव जानकर यांची सोईस्कर भूमिका आणि मनमानीला कंटाळून राष्ट्रीय समाज पक्षाच्या २२ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आज याबाबत बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातच असून महादेव जानकर यांच्या विचारांशी फारकत घेत असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.
महादेव जानकर यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या २२ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उंडवडी कडेपठार येथे बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय समाज पक्षात राहूनच यशवंत सेनेच्या माध्यमातून हा लढा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी महादेव जानकर यांची साथ सोडण्याचाही निर्धार यावेळी करण्यात आला.
महादेव जानकर यांनी ज्या विचारांशी प्रेरित होवून पक्षाची स्थापना केली. त्या विचारांशी फारकत घेत ते आता वेगळी भूमिका घेत आहेत. त्यामुळे धनगर समाजाच्या मूळ प्रश्नांकडेच दुर्लक्ष झाले असून मंत्रीपद मिळाल्यानंतरही जानकर यांच्या माध्यमातून समाजासाठी एकही धोरणात्मक निर्णय झाला नाही असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पक्षाचे एकमेव आमदार रत्नाकर गूट्टे यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. महादेव जानकर यांची साथ सोडत असलो तरी पक्षावर आमचाच हक्क असून आम्ही त्यासाठी कायदेशीर लढा देऊ असेही यावेळी सांगण्यात आले.