मुंबई : प्रतिनिधी
सत्तापालट झाल्यानंतर आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. यामध्ये विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाचे भाषण करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढत फार बाकडं वाजवू नका; तुमच्या मंत्रीपदाचंही काही खरं नाही असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
कोरोनामुक्त झाल्यानंतर अजितदादांनी आज विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर अजितदादांनी अभिनंदनपर भाषण करताना आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. आता नवीन सरकार आलं असलं तरी सर्वांमध्ये अजूनही धाकधूक आहे. सध्या जे काही झालं त्यातून भाजपच्या १०५ आमदारांचं तरी समाधान झालं का हे त्यांनी त्यांच्या सदविवेकबुद्धीला स्मरून सांगावं असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
याचवेळी दादा, तुम्ही बाकडं वाजवू नका; तुम्हालाही मंत्रीपद मिळणार का नाही हे सांगता येत नाही. त्यामुळं कुठं बाकडं वाजवत बसता असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. एवढ्यावरच न थांबता अजितदादा म्हणाले, आता शिवसेनेच्या ज्या आमदारांनी बंड केलं. पण त्यातल्या कितीजणांना मंत्रीपद मिळेल हेही सांगता येत नाही. त्यामुळं पुढे काय होईल सांगता येत नाही. एकानाथरावांनी माझ्या कानात सांगितलं असतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे तर आम्ही तुम्हाला संधी दिली असती असंही ते सांगायला विसरले नाहीत.
आता जावयाने लाड पुरवावेत : अजितदादा
राहुल नार्वेकर हे विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे अर्थात आमचे जावई आहेत. इतके दिवस जावई म्हणून आम्ही त्यांचे लाड पुरवले आहेत. त्यामुळे आता नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सासरच्या लोकांचे लाड पुरवावेत, ही अपेक्षा असल्याचं अजितदादांनी सांगितलं.
एकूणच कोरोनामुक्त झाल्यानंतर अजितदादांनी आज प्रथमच सभागृहात हजेरी लावली. मागील काही दिवसात कोरोनामुळे अजितदादा घरीच उपचार घेत होते. आज मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतर अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत राजकीय प्रगल्भता दाखवून दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.