बारामती : प्रतिनिधी
राधाकृष्ण विखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यावर अजितदादांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर देत महाविकास आघाडीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आमचं बरं चाललंय अशा शब्दांत अजित पवार यांनी त्या ऑफरवर उत्तर दिले आहे.
बारामतीत आज सायन्स पार्कचं उदघाटन आणि शरद पवार फेलोशिप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोबत येण्याबद्दलची ऑफर दिल्यावरून प्रश्न विचारला. त्यावर अजितदादांनी मिश्किल उत्तर दिले.
कोणाला काय वक्तव्य करायचे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. आम्ही जिथे आहोत तिथे आमचं बरं चाललं आहे असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीतच सुखी असल्याचे स्पष्ट केले. देहुतील कार्यक्रमावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. देहुत अतिशय चांगला कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान पहिल्यांदाच त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे जे काही घडले त्यावर आपल्याला काहीही बोलायचे नसल्याचे त्यांनी सांगितले.