मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरील आरोपांवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात आला आहे. याबाबत आता संजय राऊत यांना मुंबईतील शिवडी न्यायालयाने नोटीस पाठवण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नीकडून हा दावा ठोकण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या १०० कोटींच्या शौचालयांच्या कामात घोटाळा केल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी केला होता. त्यातून मानसिक छळ आणि बदनामी झाल्याचे या दाव्यात म्हटले आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या पत्नीवर याबाबत आरोप केले होते. त्यावर सोमय्या यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शिवडी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून संजय राऊत यांना याबाबत नोटीसही पाठवण्यात आली आहे.
न्यायालयाने संजय राऊत यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, मागील काही काळात सोमय्या विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यानंतर आता सोमय्या यांनी थेट संजय राऊत यांच्याविरोधात दावा ठोकल्याने हा संघर्ष पुन्हा उफाळून येणार आहे.