
नवी मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या केतकी चितळेवर रबाळे पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तिला आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
केतकी चितळे हिने आपल्या फेसबुकवर १ मार्च २०२० रोजी एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने अनेक धर्मांचा उल्लेख केला होता. याच पोस्टमध्ये तिने नवबौद्धांबद्दलही मत मांडले होते. नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात असा उल्लेख तिने या पोस्टमध्ये केला होता. त्यामुळे नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
आज रबाळे पोलिसांनी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर करत पोलिस कोठडीची मागणी केली. समाजात तेढ निर्माण होणारे लिखाण केतकीकडून होत असल्याने चौकशी गरजेची आहे. त्यामुळे तिला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला पाच दिवसांची म्हणजेच २४ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.