
पुणे : प्रतिनिधी
इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. महिलांवर कोणी हात उगारला तर हात तोडून हातात देऊ या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर श्रीमंत कोकाटे यांनी हे मध्ययुगीन काळातील कायदे असल्याचं म्हटलं आहे. हातपाय तोडण्याची भाषा ही संविधानिक लोकशाहीच्या विरोधातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात निवेदन देण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत यापुढे कोणी जर महिलेवर हात उगारला, तर त्याचे हात तोडून हातात देवू असे म्हटले होते. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर आता श्रीमंत कोकाटे यांनीही टीका केली आहे.
हात तोडू, पाय तोडू हे मध्ययुगीन काळातील कायदे आहेत. ते संविधानिक लोकशाहीच्या विरोधातील आहेत असे श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले आहे. एकेकाळी राष्ट्रवादीच्या जवळ असलेल्या श्रीमंत कोकाटे यांनी थेट सुप्रिया सुळे यांच्यावरच निशाणा साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.