मुंबई : प्रतिनिधी
मशिदींवरील भोंग्यांवरुन राज्यातलं राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात फटकारले आहे. हे राज्य कायद्यावर चालतं, इथे कुणाची हुकुमशाही चालणार नाही. जो काही अल्टीमेटम द्यायचा आहे तो आपल्या घरच्यांना द्या अशा शब्दात अजितदादांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अल्टीमेटमची भाषा कोणीही वापरू नये. ही हुकुमशाही नाही. कायदा हा सर्वांसाठी सारखाच आहे. प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे गोष्टी होतील. कायदा हातात घेण्याचं धाडस कुणी दाखवू नये. जर कोणाला अल्टीमेटम द्यायचाच असेल तर तर तो आपल्या घरातल्याना द्यावा अशा शब्दात अजित पवार यांनी भोंग्यावरुन सुरु असलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चाललेले राज्य आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. कायद्याचा मान राखूनच सर्व गोष्टी होतील. त्यामुळे तिथे आम्हीही असलो तरी कायदा सर्वांसाठी समान असेल असेही अजित पवार म्हणाले.