पुणे : प्रतिनिधी
एका मृतदेहावरील अंत्यसंस्कारादरम्यान चितेवर पेट्रोल ओतल्याने भडका उडून दहा ते बारा जण होरपळ्याची घटना पुण्यातील राजा बहाद्दुर मिल रस्त्यावरील कैलास स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन ते तीन जण गंभीर होरपळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी दीपक प्रकाश कांबळे (वय ४५) यांनी शनिवारी सकाळी सातच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ससून रूग्णालयातील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत नेण्यात आला. अग्नी दिल्यानंतर प्लास्टिक कॅनमधील पेट्रोल चितेवर ओतण्यात आले. त्याचवेळी स्मशानभूमीतील ब्लोअर यंत्रणा सुरु करण्यात आली.
ब्लोअरच्या हवेमुळे पेट्रोल ओतताना भडका उडला. त्यामुळे दहा ते बाराजण होरपळले आहेत. त्यामध्ये तीन ते चारजण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.