मुंबई : प्रतिनिधी
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे अशा नामवंत अभिनेत्यांसोबत विविध चित्रपटांमधून भूमिका साकारणाऱ्या मराठी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
‘धुमधडाका’, ‘पागलपन’, ‘अर्जुन देवा’, ‘कुंकू झाले वैरी’ आणि ‘लग्नाची वरात लंडनच्या घरात’ अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रेमा किरण यांनी काम केले होते. ‘धुमधडाका’ चित्रपटातील त्यांनी साकारलेली ‘अंबाक्का’ प्रचंड गाजली होती. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे अशा नामवंत अभिनेत्यांसोबत विविध चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. १९८९ मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. त्यातच आज त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.