मुंबई : प्रतिनिधी
मुंबई पोलिसांवर आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा काल खार पोलिस ठाण्यातील एक व्हिडीओ समोर आला. त्यानंतर आता सांताक्रूझ पोलीसही खासदार नवनीत राणा यांच्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करणार आहेत. मुंबई पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे.
आपण मागासवर्गीय असल्याने सांताक्रूझ पोलिसांनी आपल्याला पाणी दिले नाही तसेच बाथरुमला जाऊ दिले नाही असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. खासदार नवनीत राणांनी केलेले हे आरोप फेटाळत लावत आपण त्यांना सन्मानाची वागणूक दिली असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
काल पोलिसांनी नवनीए राणा व रवी राणांचा चहा घेताना एक व्हिडिओ जारी केला होता. त्यानंतर आता सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील व्हिडीओ समोर आणला जाणार आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमधील हा व्हिडीओ असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यामध्ये पोलिसांनी नवनीत राणा यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार केला असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. नवनीत राणांना अधिकाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृह वापरण्याची मुभा दिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व गोष्टी लॉकअपमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.
आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी देण्यात आलं नाही, तसेच बाथरूमदेखील वापरु दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खार पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे.
मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओनंतर आता ही अपमानास्पद वागणूक खार नव्हे तर सांताक्रूझ पोलिसांनी दिली असल्याचा आरोप राणांचे वकील ॲड. रिझवान मर्चंट यांनी केला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस ठाण्यातही चांगली वागणूक दिल्याचे स्पष्ट करत मुंबई पोलिसांनी त्यासंबंधीचा एक व्हिडीओ जारी करणार असल्याचे सांगितले आहे.