इंदापूर : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत सोमवारी रात्री भेट घेतली. राज्यात सध्या सुरु असलेल्या वीजेच्या भारनियमनप्रश्नी भाजपकडून शासनावर दबाव वाढविणे यासह विविध विषयांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार येत्या काही दिवसांत या प्रश्नांवर भाजप आक्रमक भूमिका घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
राज्य सरकारने विधिमंडळात ३ महिने वीज तोडणार नाही असे जाहीर केले. मात्र दुसर्या बाजूला वीज भारनियमन लागू करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. भारनियमनामुळे ग्रामीण जनता त्रस्त झाली असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यातील विरोधी पक्ष नेता म्हणून मी यासंदर्भात राज्य सरकारला जाब विचारणार आहे तसेच भाजपच्या संघटना पातळीवरही भारनियमनाच्या विरोधात राज्यभर आवाज उठविला जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या भेटीत पक्ष संघटना बळकट करणे, साखर उद्योगातील केंद्र सरकारशी संबंधित विषय, आगामी निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती आदी अनेक विषयांवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात सविस्तरपणे चर्चा झाली.