मुंबई : प्रतिनिधी
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्यसरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी जनता दरबारासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलिस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहे अशा शब्दात मुंबई पोलिसांच्या कामाबाबत पाठ थोपटली.
औरंगाबाद येथे मनसेकडून सभा घेण्यात येत आहे. या सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्त एक दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय देतील, यासाठी पोलिस महासंचालकांशीही ते चर्चा करणार आहेत असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. काल सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतरही जर कुणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यावर औरंगाबादचे पोलिस आयुक्त निर्णय घेतील. हा त्यांचा अधिकार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.