मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती आज ईडीने जप्त केली आहे. या कारवाईमध्ये त्यांच्या अलिबागमधील जमिनी आणि इतर मालमत्ता त्याचबरोबर दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. यांच्यावरील या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर लगेचच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ असत्यमेव जयते ‘ असे ट्विट त्यांनी केले आहे.
ईडीच्या या कारवाईला सामोरे जाण्यासाठी आम्ही खंबीर असून जर आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेल असे आवाहन संजय राऊत यांनी दिले आहे. ईडीने जप्त केलेल्या त्या घरामध्ये माझे कुटुंब राहत आहे. घर जप्त करून भाजपला आनंद झाला आहे. आम्ही हे घर आमच्या कष्टातून घेतले आहे, जर त्यातील एक रुपयाची अवैध संपत्ती असेल तर ती भाजपला दान करेन. केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई केली असल्याचा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
राजकीय सुडांच्या कारवायांना मी घाबरत नसून मराठी माणसांवर हा सूड घेतला जात आहे. महाराष्ट्र राज्याने इतक्या खालच्या पातळीचे राजकारण कधीच पाहिले नव्हते. शपथपत्रात माझ्यावर असलेल्या ५५ लाखांच्या कर्जाची माहिती दिली असून या कारवायांना सामोरे जाण्यासाठी मी खंबीर आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.