पुणे : प्रतिनिधी
हिंजवडी येथील आयटी पार्क परिसरातील मुळा-मुठा नदीच्या काठावर एका झाडाला मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मुलीचा खून करून तिचा मृतदेह झाडाला लटकावला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील आयटी पार्क परिसरातील मुळा मुठा नदीच्या काठावर निर्जनस्थळी असलेल्या एका झाडाला मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.या मुलीचा खून चार ते पाच आठवड्यापूर्वी करून मृतदेह झाडाला लटकवला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला आहे. या मुलीची आत्महत्या नसून खून केला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.सध्या या परिसरातील बेपत्ता महिलांची तक्रारीबाबत शोध सुरू आहे. जर या परिसरातील कोणी मुलगी किंवा महिला बेपत्ता असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी स्वतः ही माहिती पोलिसांना द्यावी. मृतदेहाची ओळख पटविण्यास याची मदत होईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर खून कसा झाला ? कशासाठी झाला? या प्रश्नांचा उलगडा होईल. त्यामुळे तपासासाठी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले आहे.