पुणे : प्रतिनिधी
राज्यांत दररोज ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली असून मुलाच्या एका चुकीमुळे पोलीस हवालदाराची २५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. त्या संबंधित पोलीस हवालदाराने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक, माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली आहे. पोलीस हवालदाराच्या मुलाने गेम खेळण्यासाठी मोबाईल घेतला होता. त्यावेळी त्यांच्या नंबरवर अज्ञात व्यक्तीने पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी फोन केला होता. तेव्हा त्या मुलाने अज्ञात व्यक्ती सांगेल ती बँकेशी निगडित माहिती भरून त्याने त्या मुलाकडून ओटीपी क्रमांक मिळवला.
त्यानंतर पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून २५ हजार रुपये काढून घेतले. पोलीस हवालदाराच्या मोबाईलवर पैसे गेल्याचा संदेश आल्याने त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी सायबर क्राईम सेलकडे तक्रार दिली आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी माहिती दिली आहे.