मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर उत्तर दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली.
अण्णा हजारे यांनी राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे. याबाबत सरकारने कोणकोणत्या यंत्रणेमार्फत कशी चौकशी केली आहे, याची माहिती द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. समाजाला याबाबतची खरी वस्तुस्थिती काय आहे. हे कळू द्या, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कोणतेच कारण नसताना गैरसमज पसरवण्याचे काम चालू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानासुद्धा याप्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सीआयडीमार्फत चौकशी केली. त्यामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी केली. याप्रकरणी त्यांनीही क्लिनचिट दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. सहकार विभागाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशीचे आदेश दिले. त्या चौकशीही काहीच निष्पन्न झाले नाही. साखर कारखान्यांवरून लोक टीका करतात. मात्र कारखाने चालवायला कोणीच पुढे येत नाही, असेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केले.