मुंबई : प्रतिनिधी
निलेश राणे आणि नितेश राणे या दोघा बंधूंनी जाणूनबुजून हिंदू मुस्लिम अशी तेढ निर्माण करुन समाजामध्ये दंगली घडतील असे भाष्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे या दोघांवर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी तक्रार दिली होती.
अनिल देशमुख हे मराठा समाजाचे आहेत, त्यामूळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. परंतु नवाब मलिक हे मुस्लिम समाजाचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानावर भाषण करताना केले होते. हे सगळं दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून होत आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
शरद पवार यांचा दाऊद इब्राहिम सोबत संबंध असल्याने ते मलिक यांचा राजीनामा घेत नसल्याचं वक्तव्य त्यांनी केले होते. त्याचबरोबर खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाऊद इब्राहिम सोबत शरद पवार यांचा संबंध आहे असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.