पुणे : प्रतिनिधी
एकीकडे कर्नाटकमध्ये हिजाब वाद सुरू असताना दुसरीकडे पुण्यामध्ये शॉर्ट्स घातल्यामुळे आयटी इंजिनियर तरुणींना चपलेने मारहाण केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मारहाण झालेल्या मुली या आयटी कंपनीत काम करत असून त्या खराडीतील आयटी लेक्सीस पार्क पीजी म्हणून सोसायटीत राहतात.दरम्यान, या मुली बऱ्याच वेळा शॉर्ट्स घालून फिरत असतात. त्यामुळे सोसायटीतील एका कुटुंबाने घर मालकांकडे त्यांच्या कपड्यावरून सवाल केला होता. त्यावर घरमालकांनी त्यांना सुनावले होते.
जुन्या रागातून या कुटुंबीयांनी घरमालक घरात नसताना फिर्यादीच्या घरात घुसून शिवीगाळ केली. त्याचबरोबर मुलींना मारहाण करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या मुलींना चपलेने मारहाण करण्यात आली. त्यानंतर या मुलींनी घरमालकिणीच्या मदतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणी एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चंदननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.