मुंबई : प्रतिनिधी
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी पुढे येत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या क्रीडा गुणाबरोबरच कलागुण मिळणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, म्हणून शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. याच योजनेतील ही एक विशेष तरतूद आहे. २०२१-२२ च्या परीक्षेकरता ही विशेष सवलत दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सातवी आणि आठवीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन गुण दिले जाणार आहेत.
इयत्ता बारावी परीक्षेचा विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीमधील क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन क्रीडा सवलतीच्या गुण देण्यात येणार आहेत. त्याबाबत वर्षा गायकवाड यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी असल्यास १० गुण, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग असल्यास १५ गुण, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी असल्यास २० गुण आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी असल्यास २५ गुण दिले जाणार आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या ज्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी एलिमेंटरी परीक्षेला बसता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षेत मिळालेल्या श्रेणीच्या आधारावर या फक्त या वर्षासाठी सवलतीचे कलागुण देण्यात येणार आहेत.