बारामती : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या कार्यशैलीमुळे संपूर्ण राज्यभरात परिचित आहेत. ज्यांच्या कार्यशैलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले आहे. परंतु कौतुक करत असतानाच शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विषयी होणाऱ्या गोड त्रासाचा अनुभव सांगितला.
बारामती पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, अजित म्हणजे दर्जेदार कामाचे सूत्र हे संपूर्ण राज्याला माहिती झाले आहे. कोणतेही काम हातात घेतले किती उत्तमपणे पार पाडायचे, हा अजित पवार यांचा स्वभाव आहे. कौतुक करतानाच शरद पवार यांनी अजितच्या या स्वभावाचा अनेकदा गोड त्रास होत असल्याचे जाहीर सभेत सांगितले. त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गोड त्रासाचे अनुभव सांगितले.
राज्यात कोठेही गेलो तरी बारामतीसारख्या वास्तू हव्यात असा आग्रह माझ्याकडे धरला जातो. मध्यंतरी मला काही वकील लोक भेटले. त्यांनी माझ्याकडे बारामतीसारख्या न्यायालयाची इमारत हवी असा आग्रह धरला. विश्रामगृहाची मागणी झाली. विश्रामगृहाची इमारतसुद्धा बारामतीच्या इमारतीसारखी हवी. बारामतीचे मेडिकल कॉलेज पाहिल्यानंतर राज्यातील अनेक लोक अशीच इमारत हवी, असे म्हणतात. पुढील वर्षभरात बारामतीचे मेडिकल कॉलेज देशात सर्वोत्तम होईल, असा विश्वास देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामती सारख्या वास्तु हव्यात, असा आग्रह माझ्याकडे धरला जातो.या गोड त्रासाचा अनुभव सांगताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.