मुंबई : प्रतिनिधी
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शहंशाह या चित्रपटातील डायलॉग म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही आमच्या मागे ईडी लावा नाहीतर सीबीआय लावा. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही कितीही आम्हाला धमक्या दिल्या तरी, ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ आणि बाप काय असतो हे तुम्ही रोज पाहत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
मुलांच्या उपद्व्यापामुळे त्यांना मानसिक त्रास होत आहे. त्याचबरोबर त्यांना वाढत्या वयामुळे विसर पडत असेल. त्यामुळे त्यांना भूतकाळ आठवत नसून आम्हाला त्याची आठवण करून द्यावी लागत आहे. राणेंच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्गात खून, खंडणी आणि दरोडे अशा घटना नऊ वर्ष घडत होत्या, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
गोवेकर, सत्यजोगी भिसे मंचेकर, अंकुश राणे या सगळ्यांचे खून कोणी केले आणि यांनी कशा प्रकारे पचवले. श्रीधर नाईक यांची हत्या कोणी केली हे सांगण्याची त्यांनी वेळ आणू नये. खूनामागचा सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असल्याचे राऊत म्हणाले.
मी पुढील आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे. तुम्ही कितीही धमकी द्या, ‘रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप लगते है’ असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती आता ठीक आहे. माणसांचे आजारपण सांगून येत नाही. जे लोक आता आमच्यावर आरोप करत आहेत त्यांच्या प्रकृतीची मला काळजी वाटत आहे. ईश्वर त्यांना चांगले आयुष्य देवो. त्यांच्या मुलांची चांगल्या मार्गानं भरभराट होईल, असा टोमणाही त्यांनी मारला.