
अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये घारगाव येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अपघाताची घटना घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नंदा रामनाथ पारधी व सुनीता रामनाथ माकोडे असे अपघातात मृत्यू पावलेल्या शिक्षकेंची नावे आहेत. दोघीही काल रात्री सहाच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर शतपावली करत होत्या. याचवेळी संगमनेरकडून आळेफाटाकडे भरधाव कार चालली होती. कार चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे शतपावली करत असणाऱ्या दोन्ही शिक्षिकांना कारची भीषण धडक बसली. या धडकेत एका शिक्षिकेचा जागेवरच मृत्यू झाला. दुसऱ्या शिक्षिकेवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन त्यांनी पंचनामा केला आहे. अपघातातील दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर मधील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी घारगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.