मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरावर सक्त वसुली संचानालय अर्थात ईडीचे छापे पडत आहेत. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट ईडीवरच गंभीर आरोप करत ‘हिम्मत असेल तर ईडीने मला अटक करावी, मला कैद करू शकतील असे कोणतेही जेल नाही’ असे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत ईडीवरही हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत म्हणाले, ईडी भ्रष्ट आहे. ईडीमधील अधिकारीही भ्रष्ट आहेत. हिम्मत असेल तर ईडीने माझ्या घरी यावे. मला दोन वर्ष कैद करू शकतील असे कोणतेच जेल नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी आणि नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. लग्नासाठी कपडे शिवणाऱ्या टेलरची ईडीकडून चौकशी करण्यात आली. संजय राऊत आमच्या धमक्यांना घाबरेल, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून संजय राऊत यांना अटक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असे काहीच होणार नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.