नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच केंद्र सरकारनेपाठवलेल्या रेल्वे रिकाम्या पाठवणे ही तुमची जबाबदारी होती, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपवर निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांचा मेंदू वस्तु संग्रहालयात जतन करून ठेवला पाहिजे, असा खोचक टोला इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. जालन्यातून जेव्हा हे मजूर रेल्वेच्या खालून जात होते, त्याच रूळावर त्यांचे छोटे छोटे तुकडे पडले होते. चंद्रकांत पाटील म्हणतात की केंद्रानं रेल्वे पाठवल्या त्या तुम्ही रिकाम्या पाठवल्या पाहिजे होत्या. त्या चंद्रकांत पाटील यांचा मेंदू वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवला पाहिजे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य खूप बेजबादारपणाचे वक्तव्य होते. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. आमच्यात राजनैतिक, वैचारिक मतभेद आहेत. महाराष्ट्र बाबतीत बोलताना पंतप्रधानांनी विचार करायला पाहिजे होता, असेही इम्तियाज जलील यांनी नमूद केले.