पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची बोर्डाची परीक्षा पुढच्या महिन्यात होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र आज १ वाजल्यापासून www.mahahsscboard.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची मुद्रित प्रत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी आजपासून विद्यार्थ्यांना विनामुल्य वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
या प्रवेशपत्राची मुद्रित प्रत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी मुख्याध्यापक – प्राचार्यांची स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावे. त्यासाठी वेगळे शुल्क यांच्याकडून आकारू नये.प्रवेशपत्रात बदल असल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय विभागीय मंडळात जाऊन ते बदल करून घ्यायचे आहेत.
प्रवेशपत्र हरवल्यास शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची दुसरी प्रत तयार करून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांना द्यावे. छायाचित्रात दोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांची छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापक- प्राचार्यांची शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी,असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.