बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील शहाजनपुर चकला या गावात वाळू माफियांनी वाळू काढण्यासाठी उपसा केलेल्या खड्ड्यात पडून चार चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावातील सिंदफणा नदीपात्रात रविवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली.
सिंदफणा नदीच्या पात्रामध्ये वाळू माफियांनी वाळू उपसा केल्यामुळे मोठे पाण्याचे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यात पडून बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही सर्व मुले ९ ते १३ वयोगटातील आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो नागरिक घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत असून जोपर्यंत जिल्हाधिकारी वाळू माफियांवर ठोस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत मृत्यूदेह ताब्यात दिले जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.