मुंबई : प्रतिनिधी
आपल्या स्वरांनी जगाला मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजता निधन झाले. लतादीदींच्या निधनानंतर कला, राजकीय यासारख्या सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लतादीदींच्या निधनाचा राज्यसरकारने दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून उद्या सोमवारी (दि. ७ फेब्रुवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र सरकार पाठोपाठ श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्य सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. त्या निमित्ताने उद्या राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने परक्राम्य संलेख अधिनियम, १९८१( सन १९८१ चा अधिनियम २६) च्या कलम २५ नुसार महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
आज संध्याकाळी साडेसहा वाजता लतादीदींच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या दृष्टीने शिवाजी पार्कवर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.