पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपचे २० ते २५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपला गळती लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. निवडणुका तोंडावर असतानाच भाजपला मोठा धक्का बसला असून येणाऱ्या काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंत यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत असा दावा जगताप यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आज शिक्कमोर्तब झाला आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर भाजपच्या विद्यमान नगरसेविका शीतल सावंत यांचे पती अजय सावंत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आज झालेल्या प्रवेशामुळे आगामी काळात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.