
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोखठोक बोलण्याची, परखड भाषणाची आणि नियोजनबद्ध कार्यक्रम, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वाची प्रचिती नेहमीच येते. मात्र अजितदादा बोलण्याच्या बाबतीत रोखठोक आणि परखड असले तरीसुद्धा; त्यांचे व्यक्तिमत्त्व तितकेच दिलखुलास आहे. असाच काहीसा प्रकार मंत्रालयात घडला आहे. अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात चोपदार पदावर कार्यरत असलेले विलास मोरे यांच्या जावयाचा आणि मुलीचा भेटण्याचा हट्ट अजित पवार यांनी पूर्ण करत त्यांची आस्थेने विचारपूस केली. या सर्व प्रसंगाने विलास मोरेंसह त्यांचे कुटुंबीय भारावून गेलं.
पुढील महिन्यात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. त्यासाठी अजित पवार अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयात चोपदार म्हणून कार्यरत असलेले विलास मोरे हे येत्या काही दिवसात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आपल्या मुलीची आणि जावयाची अजितदादांशी भेट घालून द्यायची त्यांची इच्छा होती. मात्र व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे याबद्दल बोलण्यास त्यांना संकोच वाटत होता.
मोरे यांनी हिमतीने ही बाब अजितदादांच्या कानावर घातली. दादांनीही आढेवेढे न घेता त्यांना भेटण्यास वेळ दिला. इतक्यावरच न थांबता त्यांनी विलास मोरे यांची कन्या स्नेहा साळुंके आणि जावई गणेश साळुंके यांना भेटून दिलखुलास गप्पा केल्या. मुंबईत कुठे राहता ? अमेरीकेत काय नोकरी करता? छोट्या बाळाला कोण सांभाळते? तुमचे लव मॅरेज झाले ? का अरेंज मॅरेज झाले? असे अनेक प्रश्न विचारत अजित पवार यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. अजितदादांच्या या आस्थेवाईकपणामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे आणि त्यांचे जावई गणेश साळुंखे व कन्या स्नेहा साळुंखे अत्यंत भावूक झाले.
विलास मोरे यांच्या मुलीला व जावयाला अनेक दिवसांपासून अजित पवार यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र विलास मोरे यांची अजित पवार यांना बोलुन दाखवण्याची हिम्मत होत नव्हती. विलास मोरे काही दिवसांनी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे विलास मोरे यांनी मोठी हिंमत दाखवत अजित पवार यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.अजित पवार यांनी तात्काळ होकार देत भेटीसाठी बोलून घेत मोरे यांच्या जावई आणि मुलीशी आपुलकीने, जिव्हाळ्याने आणि दिलखुलास मनाने गप्पा केल्या.