मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरोनावर मात केली आहे. २४ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी उपचार सुरु होते. सात दिवसांनी म्हणजेच आज त्यांनी ट्विट करत माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी याबाबत ट्विट केले आहे. माझी कोरोना-१९ आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी माझ्या सर्व डॉक्टरांचे, मित्रांचे आणि हितचिंतकांचे आभार मानतो. मी लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणारे आणि माझ्यासाठी शुभेच्छा पाठवणाऱ्यांचे मी आभार मानतो,असे शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, २४ जानेवारी रोजी शरद पवार यांनी ट्विट करत कोरोनाचा संसर्ग झाली असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी, युवा नेते पार्थ पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवार यांना बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या.