पणजी : वृत्तसंस्था
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून सरकारवर टीका केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा वाईन व्यवसाय असून एका मोठ्या व्यावसायिकांशी त्यांची भागीदारी असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अमित शहा यांचा मुलगा ढोकळा आणि किरीट सोमय्या यांचा मुलगा चणे- शेंगदाणे विकतो का असा संतप्त सवाल केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, जर आमची जर वायनरी असेल तर किरीट सोमय्या यांनी ती वायनरी चालावी. मी त्यांच्या नावावर करून देईल. कोणी कोणता व्यवसाय करावा, हा व्यक्तिगत प्रश्न आहे. किरीट सोमय्या यांचा मुलगा चणे- शेंगदाणे विकतो का ? भाजप नेत्यांची मुले रस्त्यावर केळी विकतात काय ? अमित शहा यांचा मुलगा ढोकळे विकतो काय..? असे प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केले.
एखाद्या कुटुंबातील व्यक्ती व्यवसाय करत असेल तर तो काय गुन्हा आहे का ? अशोक गर्ग हे माझे चांगले मित्र आहेत. एखाद्या कंपनीत संचालक असणे हा काही गुन्हा आहे का ? कुणी कोणताही व्यवसाय करू शकतो. भाजपाचे थोतांडी लोक काही म्हणत आहेत. हे मला कोणीतरी सांगितले. त्यानंतर शरद पवार यांचा मला फोन आला होता. तेही या वक्तव्यांवर हसत होते, असेही संजय राऊत म्हणाले.
जर माझ्या नावावर काही वाईन कंपन्या असतील तर; मी त्या कंपन्या किरीट सोमय्या यांच्या नावावर करून देतो त्यांनी त्या चालाव्यात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.