पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे आज दीर्घ आजाराने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. अनिल अवचट यांनी साहित्य विश्वासोबत समाजात वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना नव्याने आयुष्य जगता यावे, यासाठी त्यांनी ‘ मुक्तांगण व्यसनमुक्ती’ केंद्राची त्यांच्या पत्नी सोबत सुरुवात केली होती. त्यांची ३८ पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९६९ मध्ये त्यांचे पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासून त्यांनी बऱ्याच सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून मजूर,दलित ,भटक्या जमाती आणि वेश्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले होते. त्याचबरोबर ते उत्तम बासरी वादक होते. एखाद्या व्यक्ती सोबत बोलता बोलता ते सहजपणे कागदाच्या घड्या घालून विविध प्रकारचे प्राणी आणि आकार बनवत असत. अवचट यांचे अजून एक वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर ते तळागाळातल्या लोकांसोबत सहज संवाद साधत.
त्यांच्या अनुभवाविषयी सांगताना म्हणायचे, समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांशी बोलायला गेलो, कागद काढला की त्यांची बोलतीच बंद होत होती. त्या भीतीमागे काहीही प्रसंग असतील. आपल्या मध्यमवर्गीयांना कागदाची भीती कळू शकणार नाही. आपल्यासमोर प्रेमपत्र, धार्मिक पोथीच्या स्वरूपात कागदी येतो. मात्र तो इथे भीतीच्या स्वरूपात येतो, मग मी कागदच सोडून दिला.