नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजप आमदार नितेश राणे यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असून त्यांना दहा दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता गडद झाली आहे.
सिंधुदुर्गचे शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सहा जणांना कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे आणि त्यांच्या साथीदाराने ३० डिसेंबरला सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दिला होता. मात्र तिथे तो अर्ज फेटाळला. त्यानंतर १७ जानेवारीला उच्च न्यायालयात जामीन फेटाळला. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असून त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.
नितेश राणे यांना येत्या दहा दिवसात जिल्हा सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर नियमित जामीनासाठी अर्ज करण्यासही सांगितले आहे. त्यामुळे तूर्तास नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.