मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानाच्या बाहेर ध्वजारोहण सोहळा पार पडला. उद्धव ठाकरे यांनी जवळपास अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीवरून सतत टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री आजारी असताना नामर्दपणाची वक्तव्य करणाऱ्यांना चपराक बसली, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आजारी असताना त्यांच्यावर अत्यंत नामर्दपणाची टीका करत होते. आता त्यांना मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सार्वजनिक कार्यक्रमात येणार आहेत. मी हे वारंवार सांगत होतो. ते शिवाजी पार्कवर आले होते.
ज्यांनी कोणी मुख्यमंत्र्याविषयी नामर्दपणाची वक्तव्य केलेले आहेत त्यांना चपराक बसली. त्यांच्या अंगात किती घाण आणि कचरा आहे हे यावरून स्पष्ट होते अशा शब्दात संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.
ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी गंभीर आजारातून जात होते. त्यावेळी आम्ही त्यांची काळजी घेतली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. मोठ्या मनाचे राजकारण संपत चालले आहे, अशी खंत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.