मुंबई : प्रतिनिधी
कोरोना काळातील काम आणि लस निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख डॉ. सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर पूनावाला यांचे वर्गमित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवार यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून सायरस पूनावाला यांचं अभिनंदन केलं आहे. शरद पवार म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माझा वर्गमित्र सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अभिमान वाटतो. सायरस पूनावाला हे शरद पवारांचे वर्गमित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यातील बीएमसीसी या महाविद्यालयात झाले.
पूनावाला यांना शर्यतींच्या घोड्यांमध्ये आवड होती. त्यांनी घोड्यांच्या रक्ताचा उपयोग विविध प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला. आणि तिथूनच सिरम इन्स्टिट्यूटची घोडदौड सुरू झाली. कोरोना काळातही पूनावाला यांनी विशेष कामगिरी करत कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती केली.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.यात एकूण १२८ मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा महाराष्ट्रातील १० जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सायरस पूनावाला आणि गायिका प्रभा अत्रे यांच्यासह कला,आरोग्य आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इतर ८ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.