पुणे : प्रतिनिधी
अपहरण झालेल्या मुलाची माहिती देण्यासाठी दोन लाखाची मागणी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.आनंद उर्फ अक्षय हनुमंत शिर्के (वय २७. रा.आळंदवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी शहरातून एका लहान मुलाचे अपहरण झाले आहे. त्याची माहिती मिळावी यासाठी फेसबुकवर नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. या तरुणाने माहिती वाचून मुलाच्या वडिलांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवला.
मुलाचे अपहरण केलेल्या गाडीची माहिती देतो, असे खोटे सांगून त्या मुलाच्या वडिलांकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलाच्या वडिलांनी अगोदर माहिती आणि फोटो देण्याची मागणी केली, तेव्हा त्या तरुणाने पैशांची मागणी केली.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाची माहिती काढली. त्यानंतर त्याला येथील आळंदवाडी येथून अटक करण्यात आली. संबंधित तरुणाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून तो आळंदवाडी येथील एका कंपनीत काम करतो.