
मुंबई : प्रतिनिधी
गोवा विधानसभा निवडणुकीवरून ऐन थंडीच्या तडाख्यात राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्या तिकिटावरुन शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत आणि भाजपा यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत असतानाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिम्मत असेल तर संजय राऊत यांनी गोव्यात जाऊन एखादा मतदारसंघ पाहून निवडणूक लढवावी, असे थेट आव्हान दिले आहे.
चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. पाटील म्हणाले, संजय राऊत जगातले विद्वान आहेत. त्यांचे फारच चालले आहे. कशाला त्यांनी पर्रीकर यांच्या मुलाला तिकीट द्या, अपक्ष लढू दे. त्यांचे कोण ऐकायला बसले आहे तिथं. हिम्मत असेल तर संजय राऊत यांनी गोव्यातून एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असे आव्हान देत चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र मोदी गुजरातमधून जाऊन उत्तर प्रदेशात लढतात, तर तुम्ही फक्त भाषण करता, अशा शब्दात टीका केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी गोवा विधानसभेवरून वक्तव्य केले आहेत. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्यावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्पल पर्रीकर यांना भाजपाने तिकीट दिले तर शिवसेना व इतर पक्ष बिनविरोध करणार का असा सवालही उपस्थित केला आहे.