
मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत निर्विवादपणे वर्चस्व मिळवत बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद आपल्याकडे घेतले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ‘नारायण राणे यांनी गल्लीतील निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्डकप जिंकला असं होत नाही, अशी खरमरीत टीका केली आहे.
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मलिक म्हणाले, नारायण राणे यांनी पैसा आणि ताकदीच्या जिवावर बँकेची निवडणूक जिंकली आहे. गल्लीतील निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही. ते केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी देश पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालायला हवे.
राणे हे देश पातळीवरील निवडणुका सोडून जिल्हा पातळीवरील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. त्यांनी उत्तर प्रदेश मधील निवडणुकीत २४ जागांची जबाबदारी घ्यावी. त्या ठिकाणी भाजपाला जिंकून आणावे. त्यावेळी आम्हाला कळेल की ते केंद्रीय मंत्री आहेत, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले नव्हते. तेथील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपाला सत्ता मिळाली. ज्या प्रकारे त्यावेळी राजकारण घडले. आताही तसेच राजकारण गोव्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी प्रमाणेच गोव्यात ‘गोवा विकास आघाडी’ व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.