बारामती : प्रतिनिधी
राज्यात प्लॅस्टिकबंदीनंतर अनेक लोक प्लॅस्टिकचा सर्रास वापर करतात. प्लॅस्टिक अविघटनशील पदार्थ असल्यामुळे जीवसृष्टी धोक्यात येते. प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा या उद्देशाने बारामती नगरपरिषद नागरिकांकडून प्लॅस्टिक कचरा विकत घेणार आहे. बारामती शहर हे प्लॅस्टिकमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बारामती शहरात मागील काही दिवसांत स्वच्छ सर्वेक्षण अभियान प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शहरात प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून त्याचीही अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने आता अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. शहरात प्लॅस्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी नागरिकांकडून प्लॅस्टिक कचरा विकत घेतला जाणार आहे.
‘लुको’ नावाच्या कंपनीद्वारे हा कचरा गोळा केला जाणार आहे. गणेश मार्केट आणि पंचायत समिती या दोन संकलन केंद्राच्या मदतीने नगरपालिका कचरा विकत घेणार आहे. प्रक्रिया होऊ शकणारा कचरा १० रुपये प्रतिकिलो, तर प्रक्रिया होऊ न शकणारा कचरा ३ रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतला जाणार आहे. त्यामुळे बारामतीकरांनी कचरा फेकून न देता संकलन केंद्रावर जमा करावा, त्याचे वाजनाप्रमाणे पैसे घ्यावेत असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा फटका पर्यावरणाला बसत आहे. ओढे, नाल्यात प्लॅस्टिकचा कचरा तयार होऊन जलचरांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे शहर पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त होवू शकेल, असा विश्वास प्रशासनाला वाटतो.