मुंबई : प्रतिनिधी
दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गुरुवारी रात्री उशीरा कोरोनासंदर्भात नविन नियमावली जाहिर केली आहे. त्यानुसार विविध कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पर्यटनस्थळांवरही निर्बंध लागू करण्यात आले असून अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच हजर राहता येणार आहे.
राज्यात मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य शासनापुढील चिंता वाढली असून गुरुवारी रात्री उशीरा नवीन निर्बंध जाहिर करण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी ही नविन नियमावली जाहिर केली आहे.
नवीन नियमावलीनुसार कोणत्याही सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमासाठी केवळ ५० लोकांना हजर राहता येणार आहे. कार्यक्रम बंदिस्त सभागृहात किंवा मोकळ्या जागेत असला तरीही हा नियम लागू राहणार आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोकांनाच हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आज जाहिर केलेल्या नियमावलीमध्ये स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लागू करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच पर्यटनस्थळांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेत प्रशासकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून प्रादुर्भाव अधिक वाढण्यापूर्वीच शासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत.