सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना मोठा झटका दिला आहे. राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचे नाव आले आहे. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आज या अर्जावर सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर नितेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल आहेत. पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू असून ते नेमके कुठे आहेत याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यातच आज त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता त्यांच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.